Success Stories | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून रात्रंदिवस अभ्यास केला. संकटांना भेटून, आर्थिक परिस्थितीवर मात करत, बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर एका सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा न्यायाधीश बनला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवत गरुड झेप घेतली आहे. कुणाल कुमार वाघमारे असे त्यांचे नाव आहे. कुणालने लहानपणापासून न्यायाधीश व्हायचे हे उराशी बाळगलेले स्वप्न आज साकार झाले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत न्यायाधीश पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल शनिवारी रात्री घोषित करण्यात आलाय. या निकालात कुणाल वाघमारे २०० पैकी १५८ गुण मिळवत महाराष्ट्रातून दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. कुणाल यांची दिवाणी न्यायाधीश (क)स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्वत्र कौतुक कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कुणाल हे रमाबाई आंबेडकर नगर येथील रहिवासी. त्यांचे वडील कुमार आणि आई नंदा या सोलापूर महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. आपल्या मुलाने न्यायाधीश व्हावे अशी त्यांचीही मनोमन इच्छा होती. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. मुलाला शिक्षणात कोणत्याच गोष्टी कमी पडू दिल्या नाहीत. त्यांच्या मुलाने देखील आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले. मुलाचे हे यश पाहून आज त्यांच्या डोळ्यांत आनंदअश्रू आले.