December 23, 2024

 दरवर्षी हजारो नवपदवीधर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेत असतात. समाजाचे आपण काही तरी देणं लागतो, ह्या भावनेने त्यांचा प्रवास हा सुरू होत असतो. मात्र ह्या क्षेत्रात प्रवेश करतांना बऱ्याच वेळा सुरवात कशी करावी ह्या वरून त्यांचा थोड्या प्रमाणात गोंधळ उडतो. मग यशस्वीतांचे मार्गदर्शन घेणे, इंटरनेट वरून माहिती घेणे वा अन्य जाणकारांकडून मार्गदर्शन घेणे असा प्रवास चालू होतो. ह्या सर्वांसाठी हा लेख महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मग आपण आता जाणून घेऊयात की स्पर्धा परीक्षा क्षेत्राची सुरुवात कशी करावी…

MPSC ची नव्याने तयारी करणाऱ्यांसाठी  काही Do’s :-

१)  आयोगाच्या वेबसाईट वरून राज्यसेवा, संयुक्त ‘गट ब’ आणि ‘गट क’ या तीन परीक्षांचा अभ्यासक्रम आणि जुन्या प्रश्नपत्रिका (किमान पूर्व परीक्षेच्या २०१५ ते २०१९ सालापर्यंत) डाऊनलोड करणे / प्रिंट करणे.  बाजारात आयते जे मिळते ते शक्य तो घेवू नये. झेरॉक्स दुकानात मिळते ते घेणे. हे सर्व मटेरीअल वारंवार शक्य तितक्या वेळेस सतत पाहणे, चाळणे आणि वाचणे. किती ही वेळा असं केले तर जास्त फायदाच होईल. प्रश्न आणि पर्याय बारकाईने पाहणे.
२)  इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतची बालभारती ची इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण आणि विज्ञान ची पुस्तके जमविणे. यात सर्व पुस्तके लागत नाहीत. सुरुवातीस काही दिवस आयोगाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतात का हे तपासणे.
३)  बालभारती पुस्तकातून वाचनास सुरुवात करणे. मात्र लगेच नोट्स काढू नयेत अगर खुणा करू नयेत.  रोज अधून मधून सक्तीने आयोगाचे प्रश्न चाळत राहणे कारण त्यातूनच नेमकं काय वाचलं पाहिजे हे कळू लागेल. असे करत करत सर्व पुस्तके वाचून संपविणे.
४)  हे वाचन करताना आपण शाळेत असताना जसे वाचले तसे वाचायचे नसून समजून घेवून, त्यातल्या आकृती, नकाशे, टेबल्स आवर्जून काळजीपूर्वक पाहणे व लक्षात घेणे.
५)  पुन्हा दुसऱ्या वाचनास सुरुवात करणे. यावेळी बालभारतीतून नोट्स काढणे. मात्र आपल्या  नोट्स म्हणजे जसेच्या तसे पुस्तकातील उतरविणे नव्हे.
६)  रोज लोकसत्ता पेपर वाचणे वा अन्य चांगले कंटेंट असणारे वृत्तपत्र वाचणे. ज्यांना इंग्रजी शक्य आहे त्यांनी इंडियन एक्सप्रेस ही पहावा.
प्रश्न पत्रिकांत चालू घडामोडींवर कसे प्रश्न विचारले आहेत, विशेष करून २०१८ व २०१९ साली ते पाहून रोजच्या वर्तमानपत्रातून वाचताना त्यावर जास्त फोकस राहील असं पाहणे.
७)  रोज दूरदर्शन सह्याद्रीच्या रात्री 9.30  च्या बातम्या काळजीपूर्वक पाहणे.
८)  सुरुवातीस बाजारातील पुस्तके विकत घेण्याची व वाचण्याची घाई करू नये. बालभारतीचे पाठ्यपुस्तके पूर्ण झाले नंतर त्याबाबत विचारपूस करणे.
९)  आपल्या अभ्यासात सातत्य ठेवणे. काही झाले तरी दिवस ब्लॅंक जाता कामा नये.            

MPSC ची नव्याने तयारी करणाऱ्यांसाठी काही Don’ts :-

१)  You Tube , Telegram channels आणि whatsapp group यावर अजिबात विश्वास ठेवू नये. सुरुवातीच्या काळात तरी हे कटाक्षाने टाळावे अन्यथा यात गुरफटून गेलात तर नंतर मार्गावर येणे खूपच कठीण जाईल. विविध सोशल माध्यमं (युट्यूब) तुम्हाला वाईट सवयी लावेल ज्या तुम्हाला भलताच रस्ता दाखवतील जो यशाचा नसेल.
२)  विविध अकादमी वाले छाप पाडतील, गोड गोड बोलतील. त्यांच्या जाळ्यात अडकू नये. भीती पैसे वाया जाणे पेक्षा सुरुवातीलाच चुकीची दिशा भेटून उमेदीची वर्षे पूर्ण वाया जाणे ची आहे. हे मी काय सांगतोय असं वाटू शकतं , पण तुम्ही अनुभव ही घेवू नका.
३)  कोणताही क्लास लावणे पूर्वी एक नाही, दहा नाही तर शंभर वेळा विचार करा. सध्या करोना काळात क्लास नाहीत मात्र ऑनलाईन वेबिनार च्या ही सापळ्यात अडकू नका. माहिती जरूर घ्या मात्र त्यात प्रवेश ओढण्याचा खटाटोप असून अंधपणे विश्वास टाकू नका.  फीस तर संपूर्ण आणि जास्त नकाच भरू. क्लास चा बाजार झाला असल्याने त्याला त्या प्रकारे हाताळा. कमीत कमी पैसे भरून काही काळ अनुभव घ्या, तशी सोय, दर्जा स्वरूप शिक्षण मिळत नसेल , तर किती ही ब्रॅण्डेड क्लास असो, पायरी चढू  नका.
४)   अलीकडे एक ते दीड वर्षापासून तयारी करत असलेल्यांना गांभीर्याने घेवू नका. साधारण तीन व त्याहून जास्त वर्षापासून तयारी करत असलेल्यांचे ऐका पण त्यांना ही अंधपणे फालो करू नका. ते सुद्धा अद्याप अपयशी आहेत हे लक्षात ठेवा. यशस्वी उमेदवार जर एखाद्या क्लास च्या मंचावरून बोलत असेल तरीही सिरीयस घेवू नका, ती जाहिरातबाजी आहे हे मनात ठेऊन मोजकं त्यातील उचला.
५)  पदवी पूर्ण नसलेल्या लोकांनी क्लास लावणेची घाई करू नये. निर्णय घेणेपुर्वी सावधानता बाळगावी. चुकीच्या दिशेने गेलात तर आपली सुरुवातीची शक्ती, उत्साह नक्कीच वाया जाण्याची भीती असेल. तेव्हा अनेकांचा सल्ला घ्या व नंतरच निर्णय.
६)  बाजारू पुस्तके आणि नोट्स पासून स्वतःला दूर ठेवा. बालभारती, NCERT आणि जुने आयोगाचे पेपर्सच सुरुवातीच्या दिवसांत खरी आणि योग्य दिशा दाखवतील.
७)  स्वत:ची इच्छा असल्यासच इकडे या. दुसरीकडे नोकरी लागत नाही म्हणून इकडे येत असाल तर नक्कीच भ्रमनिरास होईल हे सदैव ध्यानात ठेवा.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *