December 23, 2024
maharashtra-police-bharti-for-17471-posts

maharashtra-police-bharti-for-17471-posts

नोकरीच्या शोधात असणारे राज्यातील (Maharashtra Police Bharti) तरुण-तरुणी पोलिस भरतीची आतुरतेने वाट पाहत असतात. अशा उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांची पोलीस भरती केली जाणार आहे. आहे. यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. तर इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

कोण कोणती पदे भरली जाणार (Maharashtra Police Bharti)
पोलीस खात्यात 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून पोलीस शिपाई,बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशा पदांच्या एकूण 17,471 जागा भरल्या जाणार आहेत.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करणार
पोलीस शिपायाची परीक्षा एजन्सीकडे दिली असून यामध्ये अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. यासाठी सायबर प्लॅटफॉर्म (Maharashtra Police Bharti) तयार करण्यात येणार असून यामध्ये सोशल मीडिया साईट,गेम सॉफ्टवेअरचा अंतर्भाव केला जाणार आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे गृहमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

CCTV संदर्भात नियमावली तयार करण्याबाबत गृह विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक हजार लोकांना प्रशिक्षित करून त्याचा उपयोग सायबर गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

पोलीस भरती 100 टक्के करण्यास वित्त विभागाची परवानगी
मधल्या काळामध्ये शिंदे-फडणवीस सरकारने पोलिसांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता. दिवाळी, रमजान नवरात्र उत्सव अशा सणावारांच्या काळामध्ये मुंबई पोलिसांवर कामाचा जास्त भर येतो. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी पोलिसांची कंत्राटी भरती करण्यात यावी; असा सरकारने निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे मुंबईत 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्यात येणार होती. या भरती प्रक्रियेत राज्य सुरक्षा महामंडळाच्या (Maharashtra Police Bharti) जवानांमधून कंत्राटी भरती करण्याचा विचार गृहखात्याने केला होता.

भरती करण्यात येणाऱ्या जवानांना मुंबई पोलिसांसारखे प्रशिक्षण देऊन त्यांना 11 महिन्यांसाठी पोलीस विभागात घेण्यात येणार होते. पण या निर्णयाला विरोधी पक्षनेत्यांनी तीव्र विरोध केला. मुंबई सारख्या शहरांची जबाबदारी कंत्राटी पोलिसांवर देणे योग्य आहे का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. राज्य सरकारमध्ये कंत्राटी भरती प्रकरणावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता वित्त विभागाने पोलीस भरती 100 टक्के करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवरच राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांसाठी मेगाभरती करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी इथे भेट द्या…
राज्यातील तरुणांना पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी; असं आवाहन करण्यात आलं आहे. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल; अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *