मुंबई : करोनाकाळात ऑनलाइन नंतर ऑफलाइन अशा विविध प्रकारे शिक्षण घेणाऱ्या इंजिनीअरिंग, विधी तसेच अन्य व्यावसायिक शाखांच्या विद्यार्थ्यांची परीक्षाकोंडी झाली आहे. काही कॉलेजांमध्ये इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नाही तसेच हातात प्रश्नसंचही मिळालेला नाही, अशा परिस्थितीत सोमवारपासून परीक्षा कशी देणार, असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.
करोनाची लाट ओसरल्यानंतर शाळा, कॉलेजे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन झालेले असल्यामुळे परीक्षा ऑनलाइनच घ्याव्यात, अशा सूचना काही पालक, विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. यानुसार मुंबई विद्यापीठाने पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाइन तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचे जाहीर केले. यानुसार इंजिनीअरिंग, विधी, व्यवस्थापन अशा विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे ऑफलाइन आयोजन करण्याचे विद्यापीठाने जाहीर केले. यानंतर परीक्षांबाबत राज्यभर संभ्रमाचे वातावरण असल्याने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबाबत सर्व कुलगरुंची बैठक आयोजित केली. त्या बैठकीत विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑफलाइन घेण्यात याव्यात. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व परीक्षा या १ जून ते १५ जुलै या कालावधीत आयोजित कराव्यात, असे निश्चित करण्यात आले.
या निर्णयानुसार उच्च शिक्षण संचालकांनी परिपत्रकही जाहीर केले. यानुसार सर्व विद्यापीठात एकसमानता यावी या उद्देशाने परीक्षांचे आयोजन करावे, असेही नमूद केले आहे. मात्र हे परिपत्रक आल्यानंतर मुंबई विद्यापीठाने सर्व परीक्षा नियोजित वेळेवर होतील, असे जाहीर केले होते. यानुसार विद्यापीठाने या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले त्यामध्ये सरकारच्या सूचनेनुसार दोन परीक्षांमध्ये दोन दिवसांची सुटीही जाहीर केली आहे. तसेच वाढीव वेळही दिला आहे. मात्र गेले दोन वर्षे परीक्षा ऑफलाइन न झाल्याने विद्यार्थी हिताचा विचार करून राज्य सरकारने परीक्षा १ जून ते १५ जुलै या कालावधीत घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार विद्यापीठाने परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. मात्र या मागणीकडे विद्यापीठ प्रशासन लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.